
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात विशेष योग शिबिर; निरोगी जीवनाचा दिला संदेश
अमळनेर (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवारी (दि. २१) सकाळी ७ ते १० या वेळेत विशेष योग शिबिर झाले. या शिबिरात मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, मंगल सेवेकरी तसेच मंदिराच्या सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.
शिबिराची सुरुवात योग प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर योग मार्गदर्शक तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम आणि खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच श्वसनक्रियांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सहभागी सर्वांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अनुलोम-विलोम, कपालभाती आदी योगप्रकारांचा सराव केला.
यावेळी मार्गदर्शक दिलीप बहिरम यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, मानसिक ताणतणाव कमी होतो आणि व्यक्तीची एकाग्रता सुधारते. आधुनिक धावपळीच्या जीवनात वाढत्या तणावामुळे अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होत असून, अशा परिस्थितीत योग हा आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रभावी उपाय ठरतो. योगाच्या फायद्यांविषयी माहिती देताना गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की, नियमित योग केल्याने रक्ताभिसरण सुधारते, स्नायू व सांधे मजबूत होतात, लठ्ठपणा नियंत्रणात राहतो तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. याशिवाय ध्यान आणि प्राणायामामुळे मन शांत राहते, सकारात्मक विचारसरणी विकसित होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
शिबिरात उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करत योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले. योगाच्या माध्यमातून निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र उभारण्यास हातभार लागेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत योगाचा नियमित सराव करण्याचा संकल्प केला.

Leave a Reply