
माणुसकीच्या दिवाळीचा गोडवा घरोघरी पोहोचणार! मंगळग्रह सेवा संस्थेच्या फराळ वाटपाचा अनोरे गावातून शुभारंभ
खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत शेकडो गरजवंतांना फराळाचे वाटप; दुष्काळग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी )यंदा दुष्काळाचे सावट गडद असताना गरजू शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कुटुंबीयांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या घरात आनंदाचा प्रकाश पोहोचावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मंगळग्रह सेवा संस्थेने ‘माणुसकीची दिवाळी’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्याचा शुभारंभ गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी अनोरे (ता. अमळनेर) येथून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, सेक्रेटरी प्रा. जयेश गुजराती, खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, रवींद्रसिंगजी कालरा आणि डॉ. रवींद्र जैन उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री मंगळग्रह देवतेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीपासून सर्वांचे रक्षण व्हावे, गाव सुखी, समृद्ध आणि निरोगी राहावे, यासाठी मंदिराचे मुख्य पुरोहित शुभम वैष्णव गुरुजी व वैभव लोकाक्षी यांनी मंत्रोच्चार आणि प्रार्थना केली.
प्रास्ताविकात मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनी गरजवंतांना फराळ, कपडे आणि अन्नधान्याच्या स्वरूपात मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि लढवय्या वृत्तीने पुढे यावे, असे आवाहन केले. शासन नागरिकांच्या पाठीशी असून, शासनाकडून जाहीर झालेली मदत अद्याप मिळाली नसल्यास संबंधितांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा. पात्र लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
खासदार स्मिताताई वाघ यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, ‘जेथे कमी तेथे आम्ही’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य केवळ शब्दांत नसून प्रत्यक्ष कृतीतून दिसून येते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज आहे. मंगळग्रह सेवा संस्थेच्या या पुढाकाराला रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीही ठामपणे साथ देऊ. समाजातील प्रत्येक घटकाने या उपक्रमात सहभागी होऊन सक्रिय सहकार्य करावे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंदिराचे सेवेकरी, आर्डी-अनोरे परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. मान्यवरांच्या हस्ते आर्डी-अनोरे परिसरातील शेकडो गरजवंत कुटुंबांना दिवाळी फराळाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत केवळ उत्सव साजरा करण्याऐवजी समाजातील वंचित आणि गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा मंगळग्रह सेवा संस्थेचा हा प्रयत्न ग्रामस्थांच्या कौतुकास पात्र ठरला. अनोरे ग्रामस्थांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत करत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम व मंगल सेवेकरी प्रकाश मेखा यांनी केले, तर आभार प्रदर्शनही त्यांनी मानले.
अनोरे गाव ठरले एकजुटीचा आणि लोकसहभागाचा आदर्श!
अमळनेर तालुक्यातील अनोरे हे आकाराने छोटे असले तरी सामाजिक एकोपा, सलोखा आणि लोकसहभागाच्या बाबतीत आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. गावात जाती-धर्मांमध्ये एकोपा असून, राजकीय मतभेदांना थारा न देता ‘एक गाव, एक गणपती’ ही परंपरा जपली जाते. मात्र, एकेकाळी या गावाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पाण्याअभावी शेती व्यवसायही संकटात सापडला होता. या परिस्थितीत मंगळग्रह सेवा संस्थेने अनोरे गाव दत्तक घेऊन गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला. पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत गावाला सहभागी करून घेत संस्थेने तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, समाजसेवक आणि शासनाच्या सहकार्याने जलसंधारणासाठी मोठे प्रयत्न केले. ग्रामस्थांनीही या कामात मोलाचे योगदान दिले. या सामूहिक प्रयत्नांतून अनोरे गावाने राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत २५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले. मंगळग्रह सेवा संस्थेने या गावाला दत्तक घेऊन विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची ही महत्त्वपूर्ण पावती ठरली. त्यामुळेच ‘माणुसकीच्या दिवाळी’ उपक्रमाचा शुभारंभ याच गावातून करण्यात आला. सामाजिक एकजूट आणि माणुसकीचा संदेश देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने दिवाळीचा गोडवा वाढविणारा ठरत आहे.

Leave a Reply