मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरातील दानपेटीतून ३५ हजारांची रोकड व सोन्याचे दागिने लंपास

अमळनेर (प्रतिनिधी) : मातोश्री नगर परिसरातील श्री चामुंडा माता मंदिरात २८ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी व कपाटांची तोडफोड केली. यात मातेच्या अंगावरील धार्मिक दागिने तसेच दानपेटीतील अंदाजे ३० ते ३५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंदिर सकाळी उघडण्यासाठी गेल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. मुख्य दरवाजाचे लॉक तुटलेले, दानपेटीची तोडफोड झालेली, कपाटे उघडी आणि आतील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. पाहणीत मातेच्या अंगावरील दोन हार, अंदाजे एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या टिकल्या आणि अंदाजे पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, तसेच दानपेटीतील रोकड चोरीस गेल्याचे समोर आले. या घटनेबाबत पत्रकार व अर्जदार हितेंद्र जगन्नाथ बडगुजर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच घटनास्थळी पंचनामा करून ठसे व इतर भौतिक पुरावे जतन करावेत, मंदिर परिसरासह आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी अर्जातून करण्यात आली आहे.

 

पाच दिवसांत चोरीची दुसरी घटना

 

मातोश्री नगर परिसरात मागील पाच दिवसांत चोरीची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. सलग चोरीच्या घटनांमुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *