
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात लघुरुद्र महाअभिषेक
अमळनेर (प्रतिनिधी) गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त येथील श्री मंगळग्रह मंदिरात बुधवार, दि. २९ जुलै रोजी विविध धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. मंदिर परिसरातील कमंडलूस्थित मंदिरातील भगवान गुरुदत्तांच्या मूर्तीवर अकरा पुरोहितांच्या मंत्रोच्चारात लघुरुद्र महाअभिषेक करण्यात आला. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
ही विशेष पूजा येथील रुबजीनगरातील भांडी व्यापारी संदीप वसंत कोळी यांनी सपत्नीक श्रद्धापूर्वक केली. वैदिक मंत्रांच्या मंगलमय निनादात संपन्न झालेल्या या पूजाविधीमुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
हिंदू संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय परंपरेत गुरू हा अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा मानला जातो. भगवान दत्तात्रय हे आदिगुरू मानले जात असल्याने त्यांची उपासना भक्तांना सद्बुद्धी, विवेक, संयम आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखविते, अशी श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनातील संकटांवर मात करण्याची शक्ती, आत्मविश्वास आणि ईश्वरनिष्ठा प्राप्त होते, असा भाव भक्तांच्या मनात आहे.
लघुरुद्र महाअभिषेक हा भगवान शंकरांना प्रिय मानला जाणारा अत्यंत पुण्यदायी वैदिक विधी आहे. या अभिषेकामुळे मनःशांती, आरोग्य, कुटुंबातील सुख-समृद्धी आणि सर्वांगीण कल्याण प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा पूजाविधींना विशेष धार्मिक महत्त्व असल्याने भाविकांनी श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग घेतला. पूजेनंतर भगवान गुरुदत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने आरतीत सहभाग घेतला. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाविकांसह मंदिराचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply