नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्याच्या दुरवस्थेवर संताप नगरपालिका प्रशासनाचे वेधले लक्ष

विजय धनराज पाटील व सहकाऱ्यांनी स्वखर्चाने केली स्वच्छता, अभिषेक व पूजन

अमळनेर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यलढ्यातील महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अमळनेर शहरातील पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय धनराज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पुतळा परिसरातील अस्वच्छता, तुटलेली रोषणाई आणि दिवसभर साधा पुष्पहारही अर्पण न झाल्याची स्थिती पाहून विजय धनराज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे पुढाकार घेत पुतळा परिसराची स्वच्छता, जलाभिषेक व पूजन केले.

“तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा” या घोषणेद्वारे संपूर्ण देशाला स्वातंत्र्य संग्रामासाठी प्रेरणा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय राष्ट्रभक्तीचे प्रतीक मानले जातात. मात्र शहरातील त्यांच्या पुतळ्याभोवती असलेली अस्वच्छता आणि दुर्लक्षित अवस्था पाहून राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर विजय धनराज पाटील यांनी आपल्या सहकारी तरुणांसह पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. हातात झाडू घेऊन परिसरातील कचरा साफ करण्यात आला. त्यानंतर नेताजींच्या पुतळ्याचे जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी नेताजींना अभिवादन करत त्यांच्या राष्ट्रसेवेच्या कार्याला आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना विजय धनराज पाटील म्हणाले, “स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींचा सन्मान करणे ही कोणत्याही प्रशासनाची कृपा नसून प्रत्येक भारतीयाची नैतिक आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे. राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महापुरुषांच्या स्मारकांची योग्य देखभाल होणे आवश्यक आहे.”

या उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण कार्यकर्त्यांनीही नेताजींच्या स्मृतीप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. या स्वयंस्फूर्त सेवाकार्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत उपक्रमाचे स्वागत केले. दरम्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळा परिसराची नियमित स्वच्छता, देखभाल आणि तुटलेल्या विद्युत व्यवस्थेची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी विजय धनराज पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. तसेच राष्ट्रपुरुषांविषयीचा आदर हा केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला केले. या घटनेमुळे शहरातील राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *