
धरणगाव-अमळनेरला विशेष एक्स्प्रेसचा थांबा मंजूर
अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून, ०७६०५/०७६०६ हजूर साहिब नांदेड-उधना विशेष एक्स्प्रेसला धरणगाव आणि अमळनेर रेल्वे स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे धरणगाव, अमळनेर आणि परिसरातील प्रवाशांना नांदेड, जालना, औरंगाबाद तसेच उधना, सुरत आणि गुजरातकडे प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष एक्स्प्रेसच्या एकूण आठ फेऱ्या नियोजित आहेत. ऑक्टोबरमध्ये ६, १३, २० आणि २७ तसेच नोव्हेंबरमध्ये ३, १०, १७ आणि २४ तारखेला ही गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक ०७६०५ नांदेड-उधना विशेष एक्स्प्रेस नांदेडहून उधनाकडे जाताना धरणगाव येथे सकाळी १० वाजता, तर अमळनेर येथे सकाळी १०.३० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६०६ उधना-नांदेड विशेष एक्स्प्रेस अमळनेर येथे रात्री ८.३० वाजता, तर धरणगाव येथे रात्री ८.५५ वाजता पोहोचणार आहे. या थांब्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः नांदेड, जालना, औरंगाबाद तसेच उधना, सुरत आणि गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा अधिक सोयीचा रेल्वे पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रवाशांनी गाडीची तारीख व वेळ तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply