
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह; क्रीडा संकुलावर चुरशीच्या लढती
अमळनेर (प्रतिनिधी) क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव आणि अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर उत्साहपूर्ण व चुरशीच्या वातावरणात झाल्या.
अमळनेर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष व सीए नीरज अग्रवाल, खान्देश शिक्षण मंडळाच्या समन्वय समितीचे चेअरमन योगेश मुंदडे, प्रताप कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. ए. के. अग्रवाल, डी. आर. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, नरेंद्र घोडपडे, तालुका क्रीडा अध्यक्ष व पर्यवेक्षक एस. पी. वाघ, क्रीडा समितीचे महेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मैदानाची पूजा करून श्रीफळ फोडण्यात आले. स्पर्धेची मशाल प्रज्वलित करून तसेच विविधरंगी फुगे आकाशात सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खेळाडूंनी टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत १०० मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. उद्घाटनप्रसंगी आमदार अनिलदादा पाटील यांनी खेळाचे महत्त्व सांगताना, खेळामुळे सांघिक भावना व एकात्मतेची भावना वाढीस लागते, मन प्रबळ, सुदृढ व सशक्त बनते तसेच शारीरिक चपळता निर्माण होऊन शरीर निरोगी व काटक बनते, असे सांगितले. खेळाडूंनी मेहनत घेण्यासोबतच स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि मोबाईलपासून दूर राहावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले. स्पर्धेसाठी पंच म्हणून के. आर. बाविस्कर, कमलेश मोरे, गोकुळ बोरसे, जे. व्ही. बाविस्कर, बापुराव सांगोरे, प्रीतेश तुरणकर, नितीन पाटील, सुनील करंदीकर, मनोज पाटील, हिरालाल बाविस्कर, विनायक सूर्यवंशी, दर्शन पाटील, मयूर बारस्कर, सागर चावरिया, योगेश पाटील आणि राज जाधव यांनी काम पाहिले व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

Leave a Reply