८० फुटी रस्त्यावर ‘ओपन बार’चा प्रकार; कारवाईची नागरिकांनी केली मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या ८० फुटी रस्त्यावर रात्रीच्या वेळी तळीरामांचा वावर वाढल्याने या रस्त्याला अक्षरशः ‘ओपन बार’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालिका व पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शहरातील अंतर्गत दळणवळण सुधारण्यासाठी शासनाच्या सुमारे ७० कोटी रुपयांच्या निधीतून पालिकेमार्फत ८० फुटी (रिंगरोड) रस्त्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी काही भाग तांत्रिक अडचणींमुळे रखडलेला आहे. या रस्त्यामुळे शिंदखेडा रोड, धुळे रोड आणि पारोळा रोड हे मार्ग शहराशी जोडले जाणार आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असतानाही काही भागांवर नागरिकांकडून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ढेकू रोड ते गलवाडे रस्ता तसेच धुळे रोड ते पिंपळे रस्ता या पट्ट्यात सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र या रस्त्यावर अद्याप पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. याचाच फायदा घेत रात्री ८ ते १२ दरम्यान तळीराम येथे जमून दारू पितात. मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा, काचेच्या बाटल्या फोडणे असे प्रकार सर्रास घडत असून काही ठिकाणी गांजा सेवनाचाही प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक व विशेषतः महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनाही घडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बिअर बार व परमिट रूममध्ये अल्पवयीनांना प्रवेश नसल्याने अनेक अल्पवयीन मुले मोकळ्या जागेत बसून मद्यपान करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. यात दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने पालकांनीही दक्ष राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

दोषींवर कठोर कारवाई करू

 

शहरातील ज्या ज्या भागात असे प्रकार होत असतील, त्या त्या भागात पोलिसांची गस्त वाढवली जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. सामान्य नागरिकांना व महिलांना त्रास होणार नाही याची काळजी पोलिस प्रशासन घेईल.

–  दत्तात्रय निकम, पोलिस निरीक्षक, अमळनेर 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *