
अमळनेरमध्ये सोंडदचे झाड कोसळले; दुचाकीचे नुकसान, मोठा अनर्थ टळला
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील भगवा चौक परिसरात महालक्ष्मी प्रोव्हिजनसमोर मंगळवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास सोंडदचे मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झाडाखाली अडकून एका मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १८ बीएफ २४०१ क्रमांकाची अजिंक्य पाटील यांची बजाज कंपनीची मोटारसायकल झाडाखाली दबली गेल्याने तिचे मोठे नुकसान झाले. संबंधित परिसरात विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. दुपारच्या वेळी वर्दळ कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, झाड कोसळल्यानंतर भगवा चौक परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. त्यामुळे स्थानिकांना काही काळ गैरसोयींचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी तात्काळ संबंधित यंत्रणेला झाड हटविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अल्पावधीतच झाड हटवून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात वारंवार वादळी वारे वाहत असल्याने धोकादायक व जीर्ण झाडांची तातडीने पाहणी करून त्यांची छाटणी अथवा तोड करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply