
एमएमआरसीने अमळनेरचे सुपुत्र गौतम बिऱ्हाडे यांची संचालक (प्रकल्प) म्हणून केली नियुक्ती
अमळनेर (प्रतिनिधी) मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने अमळनेरचे सुपुत्र गौतम बिऱ्हाडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत त्यांची संचालक (प्रकल्प) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बिऱ्हाडे हे अमळनेर येथील जी. एस. हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून ते वरिष्ठ आयआरएसई अधिकारी आणि नामांकित सिव्हिल इंजिनिअरिंग तज्ज्ञ आहेत. भारतीय रेल्वे आणि मेट्रो रेल प्रकल्पांमध्ये त्यांना ३३ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू येथून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
मोठ्या प्रमाणावर बहुआयामी पायाभूत प्रकल्पांचे नियोजन, डिझाइन, अंमलबजावणी आणि कमिशनिंग यामध्ये त्यांना व्यापक अनुभव आहे. भूमिगत व उन्नत मेट्रो कॉरिडॉर, पूल आणि रेल्वे प्रणालींच्या उभारणीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या नियुक्तीपूर्वी ते महा-मेट्रो, पुणे येथे कार्यकारी संचालक (भूमिगत) म्हणून कार्यरत होते. तसेच मध्य रेल्वेतील विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण करणे, तसेच सुरक्षा व गुणवत्ता मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ते ओळखले जातात.
त्यांचा प्रकल्प व्यवस्थापन, करार प्रशासन आणि अंतर्गत समन्वयातील अनुभव एमएमआरसीच्या प्रकल्प अंमलबजावणीला अधिक बळकटी देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. एमएमआरसीने त्यांचे स्वागत केले असून चालू व आगामी प्रकल्पांना दिशा देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल अमळनेर येथील मित्रपरिवार व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply