अमळनेरच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना आधुनिक स्वच्छता व्यवस्थापनाचे धडे; चार दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा

अमळनेर (प्रतिनिधी) शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत आयोजित चार दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा उत्साहात झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर नगरपरिषदेच्या सभागृहात २३ ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रभाग मुकादम, सफाई कर्मचारी, घंटागाडी व ट्रॅक्टर चालक, मदतनीस तसेच घनकचरा प्रक्रिया केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान कचऱ्याचे उगमस्थानी वर्गीकरण, कचरा संकलन, सुरक्षित वाहतूक, शास्त्रोक्त प्रक्रिया व विल्हेवाट, स्वच्छतेच्या आधुनिक पद्धती तसेच कामाच्या ठिकाणी आरोग्य व सुरक्षितता या विषयांची माहिती देण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात या पद्धतींचा अवलंब करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

अमळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. यावेळी आरोग्य निरीक्षक संतोष जाधव, स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे, संतोष माणिक, शहर समन्वयक गणेश गढरी व युनूस शेख उपस्थित होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौशल्य, कार्यक्षमता आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वाढविण्यासह शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक आधुनिक व प्रभावी करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळे शहराच्या स्वच्छता व्यवस्थापनाला अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *