अमळनेरात तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १३ शाळांमधील १३० विद्यार्थ्यांचा सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी) येथील नोबल पोदार लर्न स्कूलमध्ये शासकीय शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील १३ शाळांमधील १३० विद्यार्थ्यांनी १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटांत सहभाग घेतला. स्पर्धेत विजयी होणारे खेळाडू जिल्हास्तरावर अमळनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर शहराचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगरपरिषद नगरसेविका स्वप्ना पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तिलोत्तमा पाटील आणि तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते माँ सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी खेळाडूंनी मेहनत, परिश्रम आणि जिद्दीने प्रयत्न करून देशाचा मानसन्मान वाढविण्यासाठी पुढे यावे तसेच खेळाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन केले.

स्पर्धेसाठी अरुण प्रभाकर सपकाळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. तसेच शेख, कैलास बाविस्कर, जितेंद्र जेठवा, नोबल पोदार स्कूलचे क्रीडा शिक्षक अर्शद शेख, जयेश मासरे आणि प्रितेश तुरणकर यांनीही पंच म्हणून जबाबदारी सांभाळली.

या प्रसंगी वामन चव्हाण, भास्कर चौधरी, शाळेचे प्राचार्य रमण कुमार, प्रशासकीय अधिकारी योगेश पाटील तसेच सहभागी शाळांचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या चेअरमन डॉ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी आणि प्रशांत भगवान सूर्यवंशी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यातही विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *