
गणेशोत्सवात ‘पहिली मदत’ ठरणार जीवनदायी; नागरिकांना CPRसह प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण
अमळनेर (प्रतिनिधी )गणेशोत्सवातील गर्दीत एखादी व्यक्ती अचानक अत्यवस्थ झाल्यास, हृदयविकाराचा झटका आल्यास किंवा श्वास गुदमरल्यास रुग्णालयात पोहोचेपर्यंत मिळणारी पहिली काही मिनिटांची मदत अत्यंत महत्त्वाची ठरते. ही बाब लक्षात घेऊन नागरिक, पोलीस, होमगार्ड तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना CPRसह प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले.
अमळनेर शहर पोलीस ठाणे, लायन्स क्लब अमळनेर आणि जय बजरंग मंडळ, पानखिडकी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. १६) रात्री ‘वेळीच उपचार शिका, जीवन वाचवा!’ या उपक्रमांतर्गत प्राथमिक उपचार व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जय बजरंग मंडळ येथे झालेल्या शिबिराच्या प्रारंभी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर आपत्कालीन वैद्यकीय सेवा तज्ज्ञ डॉ. विक्रांत पाटील व डॉ. मिलिंद नवसारीकर यांनी विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये करावयाच्या प्राथमिक उपचारांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे, CPR कसा द्यावा, श्वास गुदमरल्यास तातडीने कोणती कृती करावी, चक्कर किंवा भुरळ आल्यास कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून माहिती देण्यात आली. तसेच रुग्णवाहिका, पोलीस आणि डॉक्टरांना तातडीने माहिती देऊन मदत पोहोचेपर्यंत रुग्णाला योग्य प्राथमिक उपचार कसे द्यावेत, याचेही प्रशिक्षण देण्यात आले.
विसर्जन मिरवणूक वेळेत काढण्याचे आवाहन
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना विसर्जन मिरवणुका वेळेत काढण्याचे आवाहन केले. मिरवणूक वेळेत सुरू केल्यास विसर्जनासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि गणेशोत्सवाचा आनंदही अधिक सुरक्षितपणे घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी PSI भगवान कोळी, पोलीस सिद्धांत शिसोदे, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, सचिव जयेश गुजराथी, डॉ. रविंद्र कॉलरा, मनीष जोशी, विनोद अग्रवाल, महेंद्र पाटील, जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष सागर वाघ, नगरसेवक गोपी कासार, सूरज परदेशी, शैलेश पाटील, हरीश भावसार, हर्षल विसपुते, किरण भावसार, प्रसाद करंजे, आदित्य भावसार, बाळू जाधव यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य, मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक, पोलीस व होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.
‘सजग नागरिक, सुरक्षित समाज’ या संदेशातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवातील कार्यकर्ते व नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी घाबरून न जाता तातडीने योग्य प्राथमिक मदत करण्याचे महत्त्व समजले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपक वाल्हे यांनी केले.

Leave a Reply