
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात दिव्यांगांना सहाय्यक साहित्याचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे सामाजिक अधिकारिता शिबिराचे आयोजन करण्यात आले. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजना आणि एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांग नागरिकांना विविध सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिलदादा पाटील प्रमुख उपस्थित होते.
शिबिरात लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक सायकली, व्हीलचेअर, श्रवणयंत्रे, काठ्या तसेच इतर सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपकरणांमुळे दिव्यांग लाभार्थ्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, गतिशीलता, श्रवणक्षमता आणि दैनंदिन कामकाजातील अडचणी कमी करण्यासाठी ही साधने उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना अधिक स्वावलंबीपणे जीवन जगण्यासाठी आधार मिळणार आहे. एडीआयपी आणि राष्ट्रीय वयोश्री या योजनांद्वारे पात्र दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांशी संवाद साधून त्यांच्या गरजा, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सेवाभावी उपक्रमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जळगाव लोकसभा मतदारसंघातील पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अमळनेर येथे हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, भाजप मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, माजी सभापती प्रफुल्ल पवार, भाजप जिल्हा सरचिटणीस महेंद्र पाटील, भाजप किसान मोर्चा अध्यक्ष निवास मोरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाताई पाटील, संदीप पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश पाटील, नगरसेवक परदेशी सर तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची विकासाभिमुख व सेवाभिमुख वाटचाल अधिक गतिमान होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली. या शिबिरासाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर (एलिम्को), जिल्हा प्रशासन जळगाव आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply