
वर्धमान नगराला पाण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! महिलांचा नगरपरिषदेवर मोर्चाचा दिला इशारा
पूर्ण पाणीपट्टी घेऊनही नळाला अपुरे पाणी; वसुलीवर बहिष्काराचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील वर्धमान नगरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तासभराच्या पाणीपुरवठ्यात केवळ १५ ते २० मिनिटेच पाणी मिळत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. पुढील सात दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपरिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा देत महिलांनी पाणीपट्टी वसुलीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत स्थानिक नगरसेवक आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. केवळ पाहणी करून प्रश्न सुटणार नसून, पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी महिलांनी केली आहे. सुंदर नगर आणि आल्हाद नगर परिसरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत असताना, लगतच्या वर्धमान नगरातील रहिवाशांना मात्र पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार महिलांनी केली आहे. एकाच शहरातील शेजारील वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याबाबत एवढी तफावत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पाणीपट्टीची पूर्ण रक्कम वसूल केली जाते, मग त्या मोबदल्यात पुरेसे पाणी का मिळत नाही, असा प्रश्नही महिलांनी प्रशासनाला विचारला आहे.
पाणीपट्टी भरणार नाही; महिलांचा आंदोलनाचा पवित्रा
पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याऐवजी केवळ पाहणी केली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पुरेसे पाणी मिळाले नाही, तर पाणीपट्टी भरणार नाही आणि पाणीपट्टी वसुलीवर बहिष्कार टाकू, असा इशारा महिलांनी दिला आहे. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, वारंवार तक्रारी करूनही दिलासा मिळत नसेल, तर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. वर्धमान नगरातील पाणीपुरवठ्याची समस्या पुढील सात दिवसांत सोडवून नागरिकांना पुरेशा दाबाने नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महिलांनी केली आहे. निर्धारित मुदतीत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. आता नगरपरिषद प्रशासन या समस्येवर कोणत्या उपाययोजना करणार आणि वर्धमान नगरातील रहिवाशांना पाणीटंचाईतून दिलासा मिळणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply