
अवैध वाळू वाहतुकीवर महसूल पथकाचा रात्री छापा; दोन डंपर जप्त
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारे दोन डंपर महसूल पथकाने पकडून कारवाई केली आहे. धुळे रस्त्यावरील लोंढवे फाटा आणि अमळनेर-ढेकू रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. दोन्ही डंपर रेतीसह तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यात वाढती गौण खनिज वाहतूक आणि चोरी रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे व तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांनी रात्रीचे गस्त पथक नेमले आहे. या पथकाने २७ रोजी पहाटे धुळे रस्त्यावरील लोंढवे फाट्यावर गोपाळ रवीन्द्र पाटील यांच्या मालकीचे एमएच ४८ एजी ७६०१ क्रमांकाचे डंपर अनधिकृतपणे गौण खनिज रेतीची वाहतूक करताना पकडले. सदर डंपर रेतीसह तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आले.
या महसूल पथकात पी. एस. पाटील (मंडळ अधिकारी, वावडे), संदीप माळी (ग्राम महसूल अधिकारी, मांडळ), एम. आर. पाटील (ग्राम महसूल अधिकारी, जैतपीर), भूषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी, बोहरा), दीपक पाटील (ग्राम महसूल अधिकारी, डांगर बुद्रुक), विकेश भोई (ग्राम महसूल अधिकारी, बाम्हने), विक्रम कदम (ग्राम महसूल अधिकारी, शहापूर), कल्पेश कुवर (ग्राम महसूल अधिकारी, रणाईचे बुद्रुक), भूषण बाविस्कर (ग्राम महसूल अधिकारी, धार), सचिन बमनाथ (ग्राम महसूल अधिकारी, करणखेडे) आणि जी. व्ही. पावरा (ग्राम महसूल अधिकारी, जुनोने) यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे अमळनेर-ढेकू रस्त्यावरील इंडियन गॅस गोडाऊनजवळ एमएच १४ एमएच ५९२४ क्रमांकाचे डंपर अनधिकृतपणे गौण खनिज रेतीची वाहतूक करताना आढळले. हे डंपर शैलेश शंकर महाजन यांचे असल्याचे समजले. महसूल पथकाने हे डंपरही रेतीसह तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा केले.

Leave a Reply