
पहिल्याच पावसात राजीव गांधी शॉपिंग सेंटर जलमय; शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांचे हाल
पालिकेच्या नियोजनशून्य कामाचा फटका; पाण्याच्या निचऱ्याची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मुख्य बाजारपेठेतील जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या स्वर्गीय राजीव गांधी शॉपिंग सेंटरमध्ये पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने व्यापारी, ग्राहक आणि विशेषतः शेतकरी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम सुरू असताना कृषी साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत दुकानांपर्यंत पोहोचावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शॉपिंग सेंटरच्या मागील बाजूस असलेल्या फायनल प्लॉट क्रमांक १७६ मध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या दुकानांच्या परिसरात करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामात तांत्रिक त्रुटी राहिल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या कामामध्ये सर्व उतार जुन्या शॉपिंग सेंटरच्या दिशेने देण्यात आल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर येथे साचत असल्याचे सांगितले जात आहे. राजीव गांधी शॉपिंग सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर कृषी सेवा केंद्रांची दुकाने आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी बी-बियाणे, खते व कृषी साहित्य खरेदीसाठी येथे येत आहेत. मात्र अंतर्गत रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अल्प पावसातच अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मुसळधार पाऊस झाल्यास अनेक दुकानांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बी-बियाणे, खते, कृषी साहित्य व इतर मालाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनीही या समस्येकडे लक्ष वेधत पालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नव्याने करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, शॉपिंग सेंटरमधील व्यापारी व नागरिकांनी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करावी. तसेच संपूर्ण परिसराचे दर्जेदार काँक्रिटीकरण करून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
पालिकेच्या बांधकाम विभागाने त्वरित दखल घ्यावी
“नव्याने विकसित करण्यात आलेल्या फायनल प्लॉट क्रमांक १७६ परिसरातील काँक्रिटीकरणाच्या कामात योग्य उतार व पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन न झाल्यामुळे राजीव गांधी शॉपिंग सेंटरमध्ये पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. परिणामी शेतकरी, ग्राहक आणि व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित पालिकेच्या बांधकाम विभागाने त्वरित दखल घ्यावी.”
— योगेश पवार, कृषी सेवा केंद्र चालक, अमळनेर
शहर अभियंत्यांना तात्काळ पाहणी करण्याच्या सूचना
“राजीव गांधी शॉपिंग सेंटरची तात्काळ पाहणी करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. साचलेल्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन त्वरित करण्यात येईल. तसेच जुन्या शॉपिंग सेंटरमधील सखल भागात बांधकाम विभागामार्फत लवकरच काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.”
— गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद

Leave a Reply