अमळनेरातील आरपीएफ अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर; उपचारासाठी मुंबईला हलविले, दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली

अमळनेर (प्रतिनिधी) स्वतःच्या सर्व्हिस पिस्टलमधून कपाळावर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरपीएफच्या सहाय्यक उपनिरीक्षक जयपालसिंग यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील रेल्वे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेत त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्याने त्यांना कायमस्वरूपी अंधत्व आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जयपालसिंग यांनी १६ जून रोजी पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या सर्व्हिस पिस्टलमधून डोक्याला गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गोळी डोक्यातून आरपार गेल्याने ते गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना धुळे येथे हलविण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने आणि दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्याने त्यांना तातडीने मुंबई येथील रेल्वेच्या विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेनंतर नंदुरबार रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मनमाड येथील फॉरेन्सिक पथकाने रक्ताचे नमुने तसेच गोळीचे अवशेष जप्त करून तपासासाठी पाठविले आहेत. घटना घडून दोन दिवस उलटूनही अद्याप कोणतीही फिर्याद दाखल झालेली नसल्याने रेल्वे पोलिसांत गुन्हा नोंद झालेला नाही.

दरम्यान, भारतीय न्यायसंहितेनुसार आत्महत्येच्या प्रयत्नासंदर्भातील पूर्वीचे कलम ३०९ रद्द झाल्याने त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होण्याची शक्यता नसल्याचे समजते. या प्रकरणाची आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी आणि अधीक्षक स्तरावरील अधिकारी सखोल चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयपालसिंग हे काही काळापासून मानसिक तणावाखाली होते. तसेच नुकतेच निलंबनाचा कालावधी पूर्ण करून ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते. या पार्श्वभूमीवरही चौकशी यंत्रणा विविध बाबींचा तपास करीत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *