
ग्रामीण संस्कृती जपण्यासाठी ‘आखाजी महोत्सव’ ठरणार वरदान : शरद धनगर
अमळनेर (प्रतिनिधी) खान्देशातील ग्रामीण संस्कृती टिकविण्यासाठी “आखाजी महोत्सव” हे एक मोठे सांस्कृतिक व्यासपीठ ठरणार असून लुप्त होत चाललेली लोकगीते, आखाजीचा झोका तसेच पारंपरिक सण-परंपरांना उजाळा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा प्रसिद्ध गझलकार शरद धनगर यांनी केले.
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात खान्देश साहित्य संघाच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी व सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा सचिव उमेश काटे, जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर, जिल्हा कार्याध्यक्ष वाल्मिक मराठे-पाटील, साहित्यिक प्रा. डॉ. रमेश माने, पूज्य साने गुरुजी शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. कुणाल पवार, तालुकाध्यक्षा सुनीता पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी इतिहास संशोधक (कै.) डॉ. जयसिंगराव पवार आणि पत्रकार (कै.) योगेश महाजन यांच्यासह ज्ञात-अज्ञात साहित्यिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त राजू बाविस्कर यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रदीप कंखरे, डॉ. कुणाल पवार, उमेश काटे, मनोहर नेरकर, दत्तात्रय सोनवणे, सीमा पाटील, पूजा पाटील, सुदर्शना पाटील, ज्ञानेश्री पाटील, शोभा शिंदे आदींचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार दरवर्षी अहिराणी लोकवाङ्मय दिन साजरा केला जातो. यावर्षी अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर “आखाजी महोत्सव” साजरा करण्यात येणार असून गवराईसारखे पारंपरिक सण पुनर्जीवित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीत विविध सांस्कृतिक व साहित्यिक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी रत्नाकर पाटील, रामेश्वर भदाणे, अशोक पाटील, निरंजन पेंढारे, गोपाल हडपे, दत्तात्रय सोनवणे, छाया ईसे, सीमा पाटील, भावना पाटील, पूजा पाटील, ज्ञानेश्री पाटील, सुदर्शना पाटील, रेखा मराठे, शोभा शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply