
नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे ढेकू रोडवरील पाईपलाईन टाकण्याचे काम ठप्प; महिन्याभरापासून नागरिक हैराण
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ढेकू रोडवरील जिजाऊ नगर परिसरात सुरू असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन कामाच्या संथ गतीमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून, मागील २५ ते ३० दिवसांपासून काम अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ढेकू रोडवरील जिजाऊ नगर परिसरात पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत; मात्र काम पूर्ण झालेले नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना दररोज ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वृद्ध नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर उघडे खड्डे असल्याने अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, नगरपालिकेकडून या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. काम सुरू असताना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तसेच कामाच्या ठिकाणी योग्य नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक दिवस कामगार किंवा यंत्रसामग्री दिसून येत नसल्याने काम ठप्प असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून पाईपलाईनचे काम जलद गतीने पूर्ण करावे, रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply