बिल्डर सरजू गोकलानी बेकायदेशीरपणे भाडेकरुचे घर पाडणे चांगलेच भोवले

जेसीबीच्या साहाय्याने पाडले घर गोकलानीसह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल

 

पीडित दाम्पत्याचा पुत्र देशसेवेत

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील न्यू प्लॉट भागातील एका भाडेकरूचे जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे घर जमीनदोस्त करून संसारउपयोगी साहित्याचे नुकसान करीत त्याला उघड्यावर आणण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी बिल्डर सरजू गोकलानीसह पाच ते सहा जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील न्यू प्लॉट भागातील देशमुख चाळ, टीपी नंबर ४५/०१ येथे शरद जाधवराव शिंदे यांचे दोन रूमचे लोखंडी पत्र्याचे भाड्याचे घर आहे. येथील वीज कनेक्शन व नळ कनेक्शन त्यांच्याच नावावर आहे. त्यांच्या कुटुंबाचा ७५ ते ८० वर्षापासून या घरात रहिवास आहे. दिनांक १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांची कोणतीही समंती नसताना सरजू गोकलानी यांच्या सांगण्यावरुन त्यांचे ४ ते ५ व्यक्ती व महेश देशमुख (सर्व रा. अमळनेर) आदींनी अनधिकृतपणे येऊन शिंदे यांची कोणतीही समंती नसताना त्यांचे घरात प्रवेश करुन संपूर्ण घर जेसीबीने पाडून जमीनदोस्त केले. व त्या रुममध्ये असलेले लोखंडी गोदरेज कपाट, लोखंडी रॅक, स्टीलचा रॅक, गॅसची स्टीलची शेगडी, कुलर, २ फॅन असे अंदाजे २० हजार रुपये  किमतीच्या सामानाचे नुकसान करुन शिवीगाळ व दमदाटी केली. तर त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. याप्रकरणी शरद शिंदे यांनी सरजू गोकलानी, त्यांचे ४ ते ५ व्यक्ती व महेश देशमुख यांच्याविरुध्द अमळनेर पोलिसांत फिर्याद दिल्याने वरील सर्वाविरुद्ध भादवी कलम 329(3),329(4),324(4),352,351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोउपनि समाधान गायकवाड हे करीत आहेत.

 

पीडित दाम्पत्याचा पुत्र देशसेवेत

 

  ज्यांचे घर पाडले गेले त्या शिंदे दाम्पत्याचा मुलगा नयन शिंदे हा सीआरपीएफ मध्ये देशसेवेत कार्यरत असून तो आपल्या कर्तव्यावर असताना घर पाडले गेल्याने त्यानेही जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती तसेच अमळनेर येथील माजी सैनिक संघटनेचे सदस्य देखील शिंदे यांच्या मदतीसाठी पोलीस ठाण्यात धावून गेले होते,यामुळे पोलिसांनी योग्य ती ऍक्शन तातडीने घेतली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *