
पिंपळे रस्त्यावर गतिरोधक; अपघातांना बसणार आळा
नगरसेविका अपूर्वा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश; नागरिकांकडून समाधान व्यक्त

अमळनेर (प्रतिनिधी )शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील पिंपळे रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग आणि अपघातांचा धोका लक्षात घेता नगरसेविका अपूर्वा चौधरी यांच्या प्रयत्नातून दोन ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित होऊन अपघात टाळण्यास मदत होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पिंपळे रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण झाल्यानंतर या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली होती. रस्ता सुस्थितीत झाल्याने अनेक वाहने वेगाने धावत असल्याचे चित्र होते. त्यातच आडव्या जोडरस्त्यांवरून मुख्य रस्त्यावर येताना वळण घेणाऱ्या वाहनचालकांना मुख्य रस्त्यावरून येणारी वाहने वेळेत दिसत नसल्याने किरकोळ अपघातांच्या घटना घडत होत्या. याचा शालेय विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत होता.
ही समस्या लक्षात घेऊन जालंधर चौधरी व नगरसेविका अपूर्वा चौधरी यांनी पालिका प्रशासनाकडे अर्ज करून पिंपळे रस्त्यावर आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने पिंपळे रस्त्यावरील दोन महत्त्वाच्या क्रॉसिंगवर गतिरोधक बसविले आहेत.
गतिरोधक बसवल्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित होत असून संभाव्य अपघातांना आळा बसण्यास मदत होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या उपाययोजनेबद्दल परिसरातील नागरिकांनी नगरसेविका अपूर्वा चौधरी व पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, पिंपळे रस्त्यासह धुळे रस्ता ते पिंपळे रस्ता जोडणाऱ्या डी.पी. रस्त्यावरही आवश्यक ठिकाणी आणखी गतिरोधक बसविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांचा वेग नियंत्रित होऊन नागरिक व विद्यार्थ्यांची सुरक्षितता अधिक वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply