
एसटीची तिकीट मशीन ते केबीसीची हॉट सीट; वृषाली मागरे यांची थक्क करणारी भरारी!
वाहक वृषाली (रुषी) मागरे यांची अमिताभ बच्चन यांच्यासोबत खास मुलाखत

अमळनेर (प्रतिनिधी) जिद्द, चिकाटी आणि ज्ञानाच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातील मुलगीही मोठे स्वप्न साकार करू शकते, याचा प्रत्यय एसटी महामंडळाच्या भुसावळ आगारातील महिला वाहक वृषाली (रुषी) मागरे यांनी दिला आहे. प्रवाशांना सेवा देणाऱ्या लाल परीच्या या महिला वाहकाने थेट ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटपर्यंत मजल मारली असून, महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसण्याचा मान मिळवला आहे. त्यांचा विशेष भाग गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता सोनी दूरचित्रवाणीवर प्रसारित झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी २०११ मध्ये वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी वृषाली मागरे यांनी एसटी महामंडळात वाहक म्हणून सेवेला सुरुवात केली. नोकरीची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी शिक्षण, सामान्य ज्ञान, स्पर्धा परीक्षा आणि कविता लेखनाची आवड जपली. २०२१ मध्ये रणवीर सिंग यांच्या ‘द बिग पिक्चर’ या कार्यक्रमातही त्यांची निवड झाली होती. या कार्यक्रमात त्यांनी रणवीर सिंग यांना राखी बांधली होती. त्यावेळी रणवीर सिंग यांनी त्यांच्या लग्नासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्याकडून तयार करून घेतलेला खास घागरा भेट दिला होता.
यानंतर ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात त्यांनी एसटी महामंडळातील वाहक म्हणून कामाचे स्वरूप, लाल परीचे महत्त्व आणि प्रवासादरम्यान आलेले विविध अनुभव सांगितले. त्यांच्या अनुभवांचे कथन ऐकून अमिताभ बच्चन यांनीही महाराष्ट्राच्या लाल परीचे कौतुक केले.
वृषाली यांच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी भुसावळ आगाराला भेट देऊन पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनीही त्यांचे अभिनंदन केले. ‘कौन बनेगा करोडपती’मधून मिळालेल्या बक्षीस रकमेतून स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, एवढे मोठे यश मिळवूनही एसटी महामंडळातील वाहक म्हणून आपले कर्तव्य यापुढेही प्रामाणिकपणे बजावत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशामुळे एसटी महामंडळासह संपूर्ण खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील तरुण-तरुणींनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश वृषाली मागरे यांच्या प्रवासातून मिळतो.

Leave a Reply