खरगे यांच्या अपमानाचा अमळनेर तालुका काँग्रेसकडून निषेध; कार्यकारिणीच्या सभेत ठराव

अमळनेर (प्रतिनिधी) : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्या जागेचे शुद्धीकरण केल्याच्या घटनेचा अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी सभेत तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेच्या निषेधाचा ठराव तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी मांडला. तो उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमताने मंजूर केला.

अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी सभा मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे उत्साहात झाली. सभेत पक्षाची संघटनात्मक बांधणी, तरुणांचा सहभाग आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेत बनसीलाल भागवत, पी. वाय. पाटील, राजेंद्र भिकन पाटील, रोहिदास कापडे, कन्हैयालाल कापडे, रामकृष्ण पाटील आणि दिलीप पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. निम व करणखेडा गावच्या जिल्हा बँक मतदानासाठी विकास सोसायटीवर निवड झाल्याबद्दल तालुका चिटणीस राजेंद्र पोलाद पाटील आणि ताराचंद सूर्यवंशी यांचा गुणवंत पाटील, डॉ. प्रकाश सोनवणे, पितांबर पाटील आणि भगवान संधानशिव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेला राजू भाट, सईद तेली, शालिग्राम पाटील, अशोक पाटील, लोटन पाटील आणि तौसीब तेली आदी पदाधिकारी उपस्थित होते. आभार सुधाकर भैसे यांनी मानले.

 

संघटन बांधणीवर भर

 

संदीप घोरपडे यांनी बी.एल.ए. अर्थात ब्लॉक लेव्हल एजंटच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट करत संघटनेत तरुणांचा सहभाग वाढविण्याची गरज व्यक्त केली. अॅड. रज्जाक शेख यांनी वाड्या-वस्त्या तसेच खेड्या-पाड्यांमध्ये जाऊन नवयुवकांना काँग्रेसच्या विचारांशी जोडण्याचे आवाहन केले. प्रा. श्याम पवार यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत भूमिका मांडली. तालुक्यात काँग्रेसची परिस्थिती चांगली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्यास काँग्रेसचे उमेदवार नक्की विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

काँग्रेस भवनाच्या जागेची मोजणी होणार

 

गजेंद्र साळुंखे यांनी अमळनेर काँग्रेस भवनाच्या जागेवरील झाडे व मलबा साफ करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच जागेची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *