जळगाव जिल्हा पोलिसांची ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धा; पत्रकारांना सहभागाचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार–जनता सहकार्य छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, पत्रकार आणि समाज यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

छायाचित्र हे केवळ एक चित्र नसून समाजातील वास्तव, भावना, संघर्ष, सेवा, कर्तव्य आणि प्रेरणा यांचे प्रभावी दस्तऐवजीकरण असते. पत्रकार समाजातील महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार असतात आणि आपल्या कॅमेऱ्याद्वारे त्या क्षणांना इतिहासात जतन करतात. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्याबरोबरच समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या छायाचित्रांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. स्पर्धेसाठी पोलीस इन पब्लिक सर्व्हिस, क्राईम, सोशल, ट्रॅफिक, जळगाव हेरिटेज, स्पोर्ट्स आणि वुमन एम्पॉवरमेंट अशा सात गटांमध्ये छायाचित्रे स्वीकारण्यात येणार आहेत. छायाचित्रे पाठविण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०२६ असून ती ९७०२२००३१५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवायची आहेत. प्राप्त छायाचित्रांचे पोलीस विभागाकडून मोठ्या आकारात प्रदर्शनासाठी सादरीकरण करण्यात येणार आहे.

या छायाचित्रांचे प्रदर्शन १५ ऑगस्ट रोजी जळगाव येथील पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सात गटांमध्ये प्रथम तीन उत्कृष्ट छायाचित्रांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून पुरस्कारांचे वितरण जळगाव जिल्ह्यातील मान्यवर मंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी पत्रकारांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले असून, आपल्या छायाचित्रांमधून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग, सेवाभाव आणि पोलीस–जनता–पत्रकार यांच्यातील विश्वासाचे प्रभावी दर्शन घडवावे, असे आवाहन केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *