अवैध डिझेल साठ्यावर प्रशासनाची कारवाई; १४७० लिटर डिझेल विक्री करून रक्कम शासन जमा होणार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदी पात्रात सापडलेल्या अवैध डिझेल साठ्याबाबत संबंधितांकडून समाधानकारक खुलासा न आल्याने तब्बल १४७० लिटर डिझेल शासन जमा करून त्याची विक्री करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी २९ मे रोजी काढले आहेत.

उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मंडळाधिकारी कल्याणी पाटील, प्रभारी पुरवठा निरीक्षक सचिन निकम आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सावखेडा येथील वाळू ठेक्यांवर अचानक छापा टाकला होता. या कारवाईत गिरीश तुळशीराम बेलदार यांच्याकडे सात कॅनमध्ये १४०० लिटर व अन्य तीन कॅनमध्ये ७० लिटर असा एकूण १४७० लिटर डिझेलचा बेकायदेशीर साठा आढळून आला होता. या साठ्याची किंमत सुमारे १ लाख ५५ हजार रुपये असल्याचे महसूल पथकाने नमूद केले आहे.

महसूल प्रशासनाने हा साठा जप्त करून अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल केला होता. तसेच संबंधित मालकाला कलम ६ अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र मुदतीत कोणताही खुलासा सादर न केल्याने उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी सदर डिझेल जप्त करण्याचे आदेश दिले. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ६ व ६ अ अंतर्गत जप्त मालाची विल्हेवाट लावण्याचे अधिकार प्राप्त असल्याने प्रशासनाने शहरातील विविध पेट्रोल पंपांकडून डिझेलचे दर मागवले होते. त्यामध्ये धुळे रस्त्यावरील श्रीकृष्ण पेट्रोल पंप (नायरा) यांचा दर सर्वाधिक १०१.५७ रुपये प्रति लिटर आढळून आल्याने जप्त डिझेल त्यांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विक्रीतून प्राप्त होणारी रक्कम ‘क्रिमिनल डिपॉझिट (८४४३)’ या लेखाशीर्षकाखाली शासन जमा करण्याचे आदेशही प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिले आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *