आठ दिवसांनीही केवळ तासभर पाणी; महिलांचा हंडा मोर्चाचा इशारा!

जय मातादी नगर, पारधी वाडा, ताडेपुरा परिसरातील नागरिक त्रस्त; दोन ते तीन दिवसांची मुदत

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील जय मातादी नगर, पारधी वाडा आणि ताडेपुरा परिसरात आठ-आठ दिवसांआड तेही केवळ तासभर कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक महिन्यांपासून कायम असलेल्या या समस्येमुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न न सुटल्याने महिलांनी नगरपरिषद प्रशासनाला दोन ते तीन दिवसांची मुदत दिली असून, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

परिसरातील नागरिकांना घरगुती वापरासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने रात्रीच्या वेळी इतर ठिकाणांहून पाणी आणावे लागत आहे. काही रहिवाशांना टँकरद्वारे पाणी मागवावे लागत असून, त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. पाणी साठवून ठेवण्यापासून ते दैनंदिन कामे करण्यापर्यंत नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांनी पाणीटंचाईबाबत नगरपरिषद प्रशासनाकडे तसेच संबंधित व्हॉल्वमनकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगितले. मात्र, परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. व्हॉल्वमन विकी महाजन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी अरेरावीची भाषा वापरत ‘तुम्हाला जे करायचे ते करा’ असे उत्तर दिल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच, स्थानिक नगरसेवक या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे. पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधेचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. महिलांनी प्रशासनाला दिलेल्या दोन ते तीन दिवसांच्या मुदतीत नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हंडा मोर्चा नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने संबंधित पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून कमी दाबाची कारणे शोधावीत आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महिलांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे जय मातादी नगर, पारधी वाडा आणि ताडेपुरा परिसरातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *