
महिलेचा विनयभंग; पतीला बॅटने मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील डीडी नगर भागात महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण करण्यात आली. तसेच तिच्या पतीच्या डोक्यात बॅट मारून जखमी केल्याची घटना २९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, डीडी नगर भागातील एक महिला सायंकाळी अंगण झाडण्यासाठी बाहेर आली असता बाहेर उभा असलेला संजय देविदास खैरनार हा तिच्याकडे टक लावून पाहत होता व डोळ्यांनी इशारे करत होता. संबंधित महिलेने ही बाब त्याची पत्नी सीमा खैरनार हिला सांगितली. याचा राग आल्याने संजय खैरनार व त्याची पत्नी नंतर महिलेच्या घरात घुसले. यावेळी संजय खैरनार याने महिलेला अंगावर ओढून तिचा विनयभंग केला व तिला मारहाण केली. महिलेचा पती भांडण सोडवण्यासाठी पुढे आला असता संजय खैरनार याने त्यांच्या डोक्यात बॅट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वार त्यांनी हातावर झेलल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली. जखमी पतीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७९, ११७, ११८(१), २९६, ३३३, ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.

Leave a Reply