
सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या अवमानाविरोधात काँग्रेस आक्रमक; संजय निरुपम यांच्या प्रतिमेचे दहन!
अमळनेर (प्रतिनिधी) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा अवमान केल्याच्या आरोपावरून अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, २२ नोव्हेंबर रोजी तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.
आंदोलनाच्या प्रारंभी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शांताराम पाटील, सुलोचना वाघ, मनोज पाटील, भागवत गुरुजी आणि ॲड. रज्जाक शेख यांनी या विषयावर आपली भूमिका मांडली. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा अवमान केल्याचा आरोप करत वक्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकाची पाने तसेच पोस्टर्स फाडून संजय निरुपम यांनी सोनिया गांधी यांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सदर आत्मचरित्रावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना अमळनेरमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे आपला संताप व्यक्त केला.
तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी “सोनिया गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही” आणि “संजय निरुपम यांचा धिक्कार असो” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर संजय निरुपम यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी महेश पाटील, गजेंद्र साळुंखे, लोटन चौधरी, प्रताप पाटील, के. व्ही. पाटील, भिकाजी पाटील, अधिकार पाटील, रोहिदास कापडे, शिंदे, कन्हैयालाल कापडे, सुधाकर भैसे, दिलीप पाटील, प्रकाश सोनवणे, ताराचंद सूर्यवंशी, आर. जे. पाटील यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या अवमानाचा निषेध नोंदवत अमळनेर काँग्रेसने या आंदोलनातून आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली.

Leave a Reply