
ग.स. सोसायटीतील मयत सभासदांच्या विमा दाव्यावरून आरोप-प्रत्यारोप
अमळनेर (प्रतिनिधी) : जळगाव ग.स. सोसायटीतील मयत सभासदांच्या नैसर्गिक विमा क्लेमचा दावा विमा लोकपाल यांच्याकडे न्यायप्रविष्ट असल्याचे उदय पाटील यांनी वृत्तपत्रात केलेले वक्तव्य धादांत खोटे असून, विमा लोकपाल यांच्या पत्रानुसार सदर दावा नाकारण्यात आल्याचा दावा रावसाहेब मांगो पाटील यांनी केला आहे. मयत सभासदांच्या कुटुंबांची निव्वळ दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

रावसाहेब मांगो पाटील यांनी सांगितले की, विमा लोकपाल यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी संस्थेला पत्र देऊन ४५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. मात्र, संस्थेने नियमबाह्य व बेकायदेशीर पॉलिसी काढून चेक दिला. त्यामुळे संस्थेने विमा लोकपाल कार्यालयाकडे नेमकी कोणती कागदपत्रे सादर केली, याचा पुरावा देण्यात आलेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील नियम ६१ तसेच कलम ८३ व ८८ अन्वये संबंधितांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक आणि या निर्णयाला समर्थन देणाऱ्या संचालकांकडून मयत सभासदांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी मागणीही रावसाहेब मांगो पाटील यांनी केली आहे. दरम्यान, विमा लोकपाल कार्यालयाकडून ग.स. सोसायटीला पत्र देण्यात आले होते. त्यामध्ये एका महिन्याच्या आत विमा कंपनीने प्रतिसाद दिला नाही तर विमा कंपनीकडे केलेल्या दाव्याची प्रत, विमा कंपनीकडून प्राप्त झालेले नकारपत्र, विमा पॉलिसीची प्रत तसेच विमा कंपनीशी झालेल्या पत्रव्यवहाराची देवाणघेवाण आणि इतर आवश्यक दस्तऐवज व कागदपत्रे सादर करण्याची मागणी करण्यात आली होती. मयत सभासदांच्या नैसर्गिक विमा दाव्याच्या मुद्द्यावरून आता उदय पाटील यांच्या भूमिकेवर रावसाहेब मांगो पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, विमा लोकपाल यांच्या पत्रातील वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply