
डि. आर. कन्या शाळेत मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) : खानदेश शिक्षण मंडळ संचालित श्रीमती डि. आर. कन्या शाळेत मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळ व दुपारच्या दोन्ही विभागांत भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रीडा साहित्याचे पूजनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी होत्या. यावेळी उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी पी. पी. जोशी, एस. एस. माळी, क्रीडा विभागप्रमुख आर. एस. सोनवणे आणि शामभाऊ पवार यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. देशासाठी त्यांनी केलेला त्याग, देशभावना, समर्पण आणि ऑलिम्पिकमधील उल्लेखनीय कामगिरी यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे त्यांनी सांगितले. क्रीडा संस्कृतीचा विकास आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठे ध्येय गाठण्याची जिद्द निर्माण होणे आवश्यक असून, आजच्या पिढीने मेजर ध्यानचंद यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन क्रीडा क्षेत्रात देशासाठी मोठे योगदान देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त नूतन किशोर भोई आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त सुकेशनी समाधान सपकाळे या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा शाळेच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर बंधू-भगिनींनी सहकार्य केले.

Leave a Reply