आदिशक्तीच्या आराधनेला आजपासून प्रारंभ; मंगळग्रह मंदिरात घटस्थापना!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला विधिवत घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उत्सवात दहा दिवस भक्ती, शक्तिउपासना आणि विविध धार्मिक विधींचा जागर होणार आहे. सकाळी ९.३० वाजता घटस्थापना, उद्यापासून श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन, तर १९ ऑक्टोबरला नवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील त्रिशुलात्मकस्थित भगवान श्री कालभैरव व माता श्री भैरवी यांच्या मंदिरासमोर आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर घटस्थापना होणार असून देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाईल. यंदा तिथीच्या वृद्धीमुळे नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असून मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीने उत्सवाची सांगता होईल.नवरात्रोत्सवाच्या या धार्मिक पर्वात अमळनेरसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

 

११ रोजी सकाळी घटस्थापना

 

रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी भगवान श्री कालभैरव व माता श्री भैरवी यांचे मंदिर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे. येथे सकाळी ९.३० वाजता विधिवत घटस्थापना होईल. घटस्थापना ही केवळ मातीच्या पात्रात धान्य पेरून कलशाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा नसून, सृष्टीतील चैतन्यशक्तीचे आवाहन करणारी आध्यात्मिक प्रक्रिया मानली जाते. कलश हे मांगल्य, समृद्धी आणि जीवनाच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक आहे, तर त्यासमोर प्रज्वलित केलेली अखंड ज्योत श्रद्धा, ज्ञान आणि अज्ञान दूर करणाऱ्या प्रकाशाचा संदेश देते.

सोमवार, दि. १२ ते रविवार, दि. १८ ऑक्टोबरदरम्यान दररोज सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत विशेष यजमानांच्या हस्ते श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन करण्यात येईल. तसेच अमळनेर शहरातील महिला मंडळांतील माता-भगिनींच्या शुभहस्ते दररोज सायंकाळी ६.३० वाजता सामूहिक आरती होईल.

 

१९ ऑक्टोबरला नवचंडी यज्ञ

 

सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी दोन सत्रांत नवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विशेष यजमानांच्या हस्ते विधिवत यज्ञ होईल. सायंकाळी पूर्णाहुतीने या धार्मिक विधीची सांगता होईल.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *