पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेची विद्यार्थिनींना माहिती; एसटी महामंडळाकडून साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत जनजागृती

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनामार्फत ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजने’ विषयी विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी साने गुरुजी विद्या मंदिर शाळेला भेट देत योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थिनींना मोफत प्रवास सवलतीचा लाभ कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांच्या गावापासून शाळेपर्यंत ये-जा करण्यासाठी एसटी बसमधून १०० टक्के मोफत प्रवास सवलत दिली जाते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी होणारा प्रवास खर्च वाचण्यास मदत होत असून, मुलींचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठीही ही योजना उपयुक्त ठरत आहे. योजनेची माहिती अधिकाधिक विद्यार्थिनींपर्यंत पोहोचावी आणि पात्र लाभार्थींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, या उद्देशाने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी साने गुरुजी विद्या मंदिर शाळेला भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजीव पाटील यांच्याकडे मोफत पास योजनेचे अर्ज सुपूर्द करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींना अर्ज भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि पास मिळविण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रसंगी आगार प्रमुख प्रमोद चौधरी, सहायक वाहतूक अधीक्षक संदेश क्षीरसागर, वाहतूक निरीक्षक मुकेश सैदाणे आणि वरिष्ठ लिपिक तुषार पाटील उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध प्रवासी कल्याणकारी योजनांची माहिती देत विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेऊन शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ करावा, असे आवाहन केले.

शाळा प्रशासनानेही या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थिनींना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शासनाच्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला बळ मिळणार असून आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *