
अमळनेरमध्ये वृद्ध महिलेला बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या आरोपी महिलेला अटक
अमळनेर (प्रतिनिधी) बसस्थानकावर वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या चोपडा तालुक्यातील वटार येथील महिलेस अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. ३१ जानेवारी रोजी सिंधुबाई संतोष चव्हाण (वय ७६, रा. अजंदे, ता. शिंदखेडा) ही महिला जळगाव येथे जाण्यासाठी दुपारी १२ वाजता अमळनेर येथे आली होती. त्यावेळी एक अनोळखी महिला त्यांच्या जवळ येऊन जबरदस्तीने फुटाणे खायला देत होती व १०० रुपये मागत होती. संबंधित महिला सिंधुबाई यांच्या मागे लागून त्यांना बसस्थानकाबाहेर रस्ता ओलांडून मेडिकल दुकानापर्यंत घेऊन गेली. तेथे पोहोचल्यानंतर आरोपी महिलेने सिंधुबाई यांच्या गळ्यातील माळ पाहून “तुझी माळ छान आहे, फोटो काढायला दे” असे सांगून ती माळ काढून घेतली. फोटो काढण्याच्या बहाण्याने माळ घेऊन ती महिला तेथून पसार झाली. या घटनेची नोंद अमळनेर पोलीस स्टेशनला होताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव व निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता आरोपी महिला ही वटार (ता. चोपडा) येथील रहिवासी आशाबाई बाळू तायडे (वय ६३) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिला १३ रोजी अटक केली आहे.
शेतातून मोटारींची चोरी ; ३० हजारांचा मुद्देमाल लंपास
दरम्यान, चांदणी कुऱ्हे येथील नवल उखा धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते १० रोजी सकाळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले असता विहिरीला लावलेला पाईप व मोटारी चोरीस गेल्याचे आढळून आले. यात १५ हजार रुपये किमतीची ५ अश्वशक्तीची एक मोटार, १० हजार रुपये किमतीची ३ अश्वशक्तीची एक मोटार तसेच शेजारील शेतकरी सुरेश राजराम पाटील यांच्या शेतातील ३ अश्वशक्तीची ‘जलपरी’ मोटार अशा एकूण सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.

Leave a Reply