अमळनेर रेल्वे स्थानकाच्या विकासकामांची जीएम रामशरय पांडे यांच्याकडून पाहणी

‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा घेतला आढावा

अमळनेर (अमळनेर) पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर रामशरय पांडे यांनी अमळनेर रेल्वे स्थानकाला भेट देत ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी जळगावच्या खासदार स्मिता वाघ उपस्थित होत्या.

डीआरएम पंकज सिंग, डीसीएम आदिश पठानिया, हिमांशू शर्मा यांच्यासह रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्थानक परिसराची पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. स्थानक परिसरातील सुविधा, प्रवाशांसाठी सुरू असलेली कामे तसेच विविध विकास आराखड्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. खासदार स्मिता वाघ यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या कामांमध्ये आवश्यक दुरुस्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी केली. तसेच रेल्वे स्थानक परिसरात अधिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, जेणेकरून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सैनानी, खा.शि. मंडळ संचालक नीरज अग्रवाल, राकेश पाटील, दीपक भोई, शिवाजी राजपूत, राहुल चौधरी तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

नरडाणा बायपासची मागणी

 

सध्या सुरू असलेल्या नरडाणा–धुळे रेल्वे मार्गाच्या कामासंदर्भात खासदार स्मिता वाघ यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. धुळे आणि जळगाव हे रेल्वेमार्गाने थेट जोडले जावे यासाठी नरडाणा येथे रेल्वे बायपास तयार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी जनरल मॅनेजर रामशरय पांडे यांच्याकडे केली. यासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा करत पत्रव्यवहारही केला. हा बायपास खानदेशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून भविष्यात मुंबई–पुणे मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या या मार्गाने चालविणे शक्य होईल. त्यामुळे खानदेशातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचे खासदार वाघ यांनी सांगितले.

 

एक्सप्रेस गाड्यांचा थांबा व पार्सल सेवा सुरू करण्याची मागणी

 

अमळनेर रेल्वे स्थानकावर अधिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी खासदार वाघ यांनी यावेळी केली. तसेच सध्या बंद असलेली पार्सल सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, जेणेकरून व्यापारी व नागरिकांना त्याचा लाभ मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *