
तालुक्यात खळबळ; तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण, १९ वर्षीय तरुणी बेपत्ता
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील टाकरखेडा, नांद्री आणि झाडी येथून तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना २८ मे रोजी उघडकीस आल्या असून शहरातून एका १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नोंदही अमळनेर पोलिसांत करण्यात आली आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, टाकरखेडा येथील नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीची आई २८ रोजी सकाळी वीटभट्टीवर कामाला गेली होती. दुपारी घरी परतल्यानंतर मुलगी घरात आढळून आली नाही. गावात शोध घेतल्यानंतर कुणाल राजेंद्र पाटील याने मुलीला पळवून नेल्याची माहिती मिळाल्याने महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाची फिर्याद दिली. दरम्यान सदर अल्पवयीन मुलगी पोलिसांना आढळून आली आहे. नांद्री येथील १५ वर्षीय मुलगी २८ रोजी रात्री कुटुंबासोबत झोपली होती. मात्र २९ रोजी पहाटे ती घरात दिसून न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. गावातील काही नागरिकांनी रोहित संजय भिल याने तिला पळवून नेल्याचे सांगितल्याने मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत. झाडी येथील १७ वर्षीय मुलीला २८ रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी मारवड पोलीस स्टेशनला दिली आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत. दरम्यान, शहादा येथील मच्छी बाजार परिसरात राहणारी १९ वर्षीय तरुणी अमळनेर येथील म्हाडा कॉलनीतील नातेवाईकांच्या घरून २८ रोजी सकाळी ११ ते २९ रोजी पहाटे ३ वाजेदरम्यान बेपत्ता झाली आहे. नातेवाईकांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

Leave a Reply