
प्रलंबित नियुक्त्यांसाठी २० जुलैपासून उपोषणाचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) लाड-पागे समितीच्या धोरणानुसार सन १९७५ पासूनची प्रलंबित नियुक्ती प्रकरणे निकाली काढण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने २० जुलै २०२६ पासून अमळनेर नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
संघटनेचे राज्याध्यक्ष नागोज मोहन कंडारे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासनाच्या १३ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयानुसार सर्व प्रलंबित प्रकरणांमध्ये सुधारित धोरणानुसार नियुक्ती देणे बंधनकारक आहे. मात्र, नगरपरिषद प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. संबंधित लिपिक आणि आस्थापना प्रमुखांनी सहा महिन्यांच्या कालावधीत शासनाकडे प्रस्तावही सादर केला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागण्यांची पूर्तता न झाल्यास २० जुलैपासून अमळनेर नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने दिला आहे.

Leave a Reply