
गलवाडे–जैतपीर दरम्यान एसटी व पिकअपची जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गलवाडे ते जैतपीर गावादरम्यान एसटी बस व पिकअप वाहनामध्ये झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. या प्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चंद्रकांत मोतीलाल पटेल (चालक, राज्य परिवहन महामंडळ, शिदखेडा आगार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ रोजी ते जळगाव–दोंडाईचा मार्गावर प्रवासी घेऊन एसटी बस चालवत होते. सकाळी ०८.१५ वाजेच्या सुमारास जैतपीर (ता. अमळनेर) शिवारातील गलवाडे गावाच्या पुढे हनुमान मंदिराजवळ बस येत असताना समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या महेंद्र पिकअप (क्रमांक एम. एच. ०४ एच. एस. ००६१) चालकाने भरधाव वेगात येत बसच्या ड्रायव्हर साईडला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालक, वाहक व प्रवासी बसमधून खाली उतरून पाहणी करत असताना परिसरातील ग्रामस्थही घटनास्थळी जमा झाले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी एसटी बसच्या ड्रायव्हर साईडचा पुढील बंपर, हेडलाईटजवळील भाग व पत्रा दाबला गेला आहे. तसेच पिकअप वाहनाचे बंपर व इंजिनचे नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी पिकअप चालक विश्वास भरत पाटील (रा. माळपिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ संजय सूर्यवंशी करत आहेत.

Leave a Reply