
अंबारे-खापरखेडा विकास सहकारी सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व; ११ पैकी ९ जागांवर दणदणीत विजय
अमळनेर (प्रतिनिधी) अंबारे-खापरखेडा येथील विकास सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत नागर गठ्या शेतकरी विकास पॅनलने सहकार पॅनलचा दारुण पराभव करत सोसायटीवरील वर्चस्व कायम केले. ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने ९ जागांवर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली.
निवडणुकीपूर्वीच नागर गठ्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार बबन गंभीर सैंदाणे हे बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर उर्वरित ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत नागर गठ्या शेतकरी विकास पॅनलचे पिरण भाऊराव पाटील, सतीश आत्माराम पाटील, मुरलीधर भिला पाटील, प्रल्हाद झुलाल पाटील, प्रकाश ताथुराव पाटील, देवीदास आनंदा पाटील, मनोज बन्सीलाल पाटील, सुरेश निळकंठ पाटील आणि हिराबाई विश्वास पाटील हे उमेदवार विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी सहकार पॅनलकडून दिगंबर अमृत पाटील आणि केवळबाई भास्कर पाटील यांनाच विजय मिळवता आला. नागर गठ्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व किरण भाऊराव पाटील, सतीश आत्माराम पाटील आणि गजेंद्र माधवराव पाटील यांनी केले, तर सहकार पॅनलचे नेतृत्व जे. के. पाटील यांनी सांभाळले. निवडणुकीच्या निकालानंतर अंबारे-खापरखेडा परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. तसेच खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह परिसरातील मान्यवरांनी विजयी पॅनलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोसायटीच्या निवडणुकीत मिळालेल्या या घवघवीत यशामुळे नागर गठ्या शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ग्रामीण सहकार क्षेत्रातील हा निकाल विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Reply