शॉर्ट सर्किटमुळे 2 बिघे मका जळून खाक; शेतकऱ्यांचे 80 हजारांचे नुकसान

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जुनोने शिवारात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन बिघे मका जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजता घडली. या दुर्घटनेत टाकरखेडा येथील शेतकरी जयश्री मनोहर पाटील यांचे सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गट क्रमांक 122/1 मधील पिकलेल्या मक्याच्या शेतात उभ्या असलेल्या विजेच्या खांबावरून ठिणगी पडून आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे पडलेल्या या ठिणगीने क्षणातच आगीचे रूप धारण केले आणि वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत संपूर्ण पिकाला भस्मसात केले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांना यश आले नाही. परिणामी संपूर्ण मका जळून खाक झाला. दरम्यान, टाकरखेडा येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी शनिवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करणार असल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी जयश्री पाटील यांनी दिली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने पंचनामा करून शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विजेच्या यंत्रणांची वेळोवेळी तपासणी करून अशा घटना टाळाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *