
धुळे-अमळनेर महामार्गावरील भीषण तिहेरी अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल
सहा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप; बसचालकाच्या फिर्यादीवरून केली कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) धुळे-अमळनेर महामार्गावरील मंगरूळ गावाजवळ ९ जून रोजी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणात अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालकाच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ९ जून रोजी सकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान धुळे-अमळनेर महामार्गावर मंगरूळ गावाच्या पुढे कार, मोटारसायकल आणि बस यांच्यात भीषण तिहेरी अपघात झाला होता. या दुर्घटनेत सुरेश विक्रम माळी (वय ५२), नंदलाल गोपाल महाजन (वय ६०), निर्मलाबाई नंदलाल महाजन (वय ५४), अनिता सुरेश महाजन (वय ४०), निलेश सुकदेव तावडे (वय २५) आणि फाल्गुनी एकनाथ भोई (वय २१) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर कारचालक आदित्य चंद्रकांत महाजन (वय २३) व दीपक दिलीप पाटील (वय ४४) हे जखमी झाले होते. या प्रकरणी बसचालक डी. बी. सोनवणे यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बलेनो कार क्रमांक जीजे-१९ एएफ-३१४७ वरील चालक आदित्य चंद्रकांत महाजन याने महामार्गावर अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकल व बसला धडक दिली. त्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी आदित्य महाजन याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५ (अ), (ब), ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.

Leave a Reply