
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी व सुरक्षा साहित्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई भिवसन गढरे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी तसेच त्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विभागातील कर्मचारी गटार, नाले, सार्वजनिक शौचालये, धुराडी, कचरा तसेच इतर अस्वच्छ ठिकाणांची साफसफाई करत असल्याने त्यांना विविध संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबूट, हातमोजे, मास्क तसेच संपूर्ण सुरक्षा संच (सेफ्टी किट) तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून काम करताना त्यांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नगरसेविका शोभाबाई भिवसन गढरे यांच्या या मागणीची दखल घेऊन नगरपरिषद प्रशासनाने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply