
महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीवर वेदांशू पाटील यांची नियुक्ती; डॉ. डिगंबर महाले गव्हर्निंग कौन्सिलवर बिनविरोध
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषी आणि उद्योजक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शतकोत्तर परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर (एमएसीसीआयए) च्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून ही नियुक्ती केली असून, चेंबरच्या शतक महोत्सवी वर्षात झालेल्या या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याचबरोबर अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांची महाराष्ट्र चेंबरच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी त्यांच्या दीर्घ अनुभव आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेने त्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. या पदावर नियुक्त होणारे ते अमळनेर तालुक्याच्या इतिहासातील पहिलेच प्रतिनिधी ठरले होते.
महाराष्ट्र चेंबरची व्यवस्थापन समिती ही संस्थेतील सर्वोच्च धोरणात्मक निर्णय घेणारी समिती मानली जाते. या समितीत अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, विविध विभागांचे उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आणि सेक्रेटरी जनरल यांचा समावेश असतो. चेंबरच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे, संस्थेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग घेणे आणि भविष्यातील दिशा निश्चित करणे ही समितीची प्रमुख जबाबदारी असते.
विशेष म्हणजे अध्यक्षांच्या विशेष अधिकारातून संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ एका सदस्याची या समितीवर नियुक्ती केली जाते. यंदा ही जबाबदारी वेदांशू पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग, शिक्षण, मनोरंजन आणि ई-कॉमर्स अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले वेदांशू पाटील हे युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात. विविध व्यवसाय क्षेत्रांतील त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र चेंबरच्या जवळपास शंभर वर्षांच्या इतिहासात व्यवस्थापन समितीवर नियुक्त होणाऱ्या सदस्यांमध्ये वेदांशू पाटील हे सर्वांत तरुण सदस्य ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे उद्योग, व्यापार आणि उद्योजक क्षेत्रात विशेष उत्सुकतेने पाहिले जात आहे. अलीकडेच पार पडलेल्या २०२६-२८ कार्यकाळाच्या निवडणुकीत अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची बिनविरोध निवड झाली होती. तसेच राज्यातील उपाध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांपैकी अनेकांची बिनविरोध तर काहींची निवडणुकीतून निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या नेतृत्वासोबत युवा उद्योजकांना संधी देण्याच्या दृष्टीने वेदांशू पाटील यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना वेदांशू पाटील यांनी अध्यक्ष रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी तसेच महाराष्ट्र चेंबरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. चेंबरच्या विकासासाठी, सभासदांच्या हितासाठी आणि शतक महोत्सवी वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र चेंबरच्या शतक महोत्सवी वाटचालीत युवा नेतृत्वाला संधी देणारे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, उद्योग-व्यापार क्षेत्रात नव्या पिढीच्या प्रतिनिधित्वाला यामुळे अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply