
जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत अमळनेर केंद्रावर १०० टक्के मतदान; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीने रंगली चर्चा
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ साठी गुरुवारी अमळनेर तहसील कार्यालयात मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत १०० टक्के मतदानाची नोंद केली.
अमळनेर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर अमळनेर व चोपडा तालुक्यातील एकूण ७६ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये अमळनेर तालुक्यातील ४१ तर चोपडा तालुक्यातील ३५ मतदारांचा समावेश होता. सकाळी ८ वाजता मतदानास सुरुवात झाली आणि दुपारी २ वाजेपर्यंत सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया नियोजित वेळेनुसार सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली. मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सतर्क होती. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. मतदारांची ओळख पडताळणी, नोंदणी आणि मतदानाची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सुरळीत पार पडली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या आणि निवडणूक साहित्य कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरक्षितपणे पुढील प्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले. मतदानादरम्यान कोणताही वाद, तणाव किंवा गोंधळाची घटना घडली नसल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांना मतदान अधिकारी गणेश शिंदे, रवींद्र जोशी आणि रवींद्र चव्हाण यांनी सहकार्य केले. जळगाव जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या या निवडणुकीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागून आहे. मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याने आता सर्वांचे लक्ष २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाकडे लागले असून, या निकालातून जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना कोणते नवे वळण मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीने मतदान केंद्रावर राजकीय रंगत
मतदान केंद्रावर राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देत मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी नेत्यांमधील दिलखुलास संवाद आणि हलक्या-फुलक्या चर्चांमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. काही काळ मतदान केंद्र परिसरात राजकीय मैफिलच रंगली होती.
महायुतीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. दुसरीकडे महाविकास आघाडीचे गुलाबराव वाघ हेही आपल्या समर्थकांसह मतदान केंद्रावर उपस्थित होते. त्यामुळे केंद्र परिसरातील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार झाले होते.

Leave a Reply