ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे १२ वीतील शाखा बदल बंद; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर गदा : आमदार अनिल पाटील

११ वी विज्ञाननंतर कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेशाची मुभा द्यावी; शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे १२ वीतील शाखा बदल बंद झाली असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर गदा आली आहे. त्यामुळे ११ वी विज्ञाननंतर कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेशाची मुभा द्यावी, अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

आमदार अनिल पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे की, राज्य शासनाने इयत्ता ११ वीप्रमाणेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता १२ वीची प्रवेश प्रक्रिया देखील ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. विशेषतः ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याची संधी नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे बंद झाल्याची बाब समोर आली आहे. २०२५ पूर्वी ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ११ वी विज्ञान शाखेनंतर १२ वीला कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध होती. तसेच ११ वी वाणिज्य शाखेनंतर १२ वी कला शाखेत प्रवेश घेण्याचाही पर्याय विद्यार्थ्यांना खुला होता. मात्र नव्याने सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीमुळे ही लवचिकता पूर्णतः बंद करण्यात आली आहे. “ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे खासगी क्लासेस लावू शकत नाहीत. विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम झेपत नसल्याने अनेक विद्यार्थी १२ वीसाठी कला किंवा वाणिज्य शाखा निवडण्याचा विचार करतात. मात्र ऑनलाईन प्रक्रियेमुळे त्यांच्यासमोर अडथळे निर्माण झाले असून त्यामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जाण्याची भीती आहे,” असे आमदार अनिल पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी पूर्वीप्रमाणे ११ वी विज्ञान शाखेनंतर १२ वी कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच शिक्षण विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार शाखा निवडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नावर लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *