हार-तुरे, केकचा खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी )माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा हार-तुरे, केक व इतर उत्सवी खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श उपक्रम अमळनेर शहरात राबविण्यात आला. संत सखाराम महाराजांच्या वाडीला लागलेल्या भीषण आगीची घटना तसेच विमान अपघातात स्व. अजितदादा यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर अनिलदादांचा वाढदिवस कोणताही जल्लोष न करता साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाला अनुसरून स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

हा समाजोपयोगी उपक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमळनेर शहराध्यक्ष दुर्गेश (डीपी) पाटील आणि भूषण लोहार यांनी स्वखर्चातून राबविला. विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा संकल्प त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून साकारला.

या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि पालकांच्या समाधानाने या उपक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. वाढदिवस हा केवळ उत्सवाचा नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याचा दिवस असावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी दर्शन पाटील, भूषण लोहार, दुर्गेश (डीपी) पाटील, जयेश पाटील, विवेक पाटील, मोहित शिंदे तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

उत्सवापेक्षा सेवेला प्राधान्य देत, समाजाप्रती असलेली संवेदनशीलता जपणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला. हार-तुरे आणि केकवर होणारा खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली ही मदतच अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तची खरी मानवंदना ठरली.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *