गांधली येथून चोरीस गेलेले १५ लाखांचे डंपर इंदोरमध्ये सापडले; एकाला अटक

तोडलेल्या अवस्थेत वाहन जप्त; नऊ दिवसांच्या पाठपुराव्यानंतर अमळनेर पोलिसांची कामगिरी

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गांधली येथील पेट्रोल पंपावरून चोरीस गेलेले सुमारे १५ लाख रुपये किमतीचे डंपर इंदोर येथे तोडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर साथीदारांची नावेही निष्पन्न करण्यात यश मिळाले आहे. त्यांच्याही लवकरच मुसक्या आवळणारअसल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोणे येथील निलेश संजय पाटील यांचे डंपर (एमएच ४८ एजी ८३०७) ३१ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गांधली येथील पेट्रोल पंपावर उभे असताना चोरट्यांनी चोरून नेले होते. एवढ्या मोठ्या वाहनाची चोरी झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार तसेच कर्मचारी विनोद संदानशिव, निलेश मोरे, सिद्धांत शिसोदे आणि प्रशांत पाटील यांच्या पथकाने तपासाची धुरा सांभाळली. डंपर पातोंडा मार्गे पुढे गेल्याचे समोर आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मध्यप्रदेश, गुजरात आणि पुन्हा मध्यप्रदेश असा पाठलाग करत तपास सुरू ठेवला. तब्बल नऊ दिवस पथक मध्यप्रदेशात मुक्कामी राहून तपास करत होते.

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजाजी नगर, इंदोर येथील खाजू खान चांद खान याने गोदाम भाड्याने घेतले असून तेथे चोरीची मोठी वाहने आणून त्यांचे भाग वेगळे केले जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ छापा टाकला असता चोरीस गेलेल्या डंपरचे केबिन, चेसिस, बॉडी, एअर टॅंक आणि डिझेल टॅंक असे भाग वेगळे केलेले आढळून आले.

पोलिसांनी खाजू खान याला अटक करून डंपरचे सर्व भाग जप्त केले. हे भाग दुसऱ्या ट्रकमधून अमळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहेत. आरोपीकडून इतर तिन्ही चोरट्यांची नावेही निष्पन्न झाली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली. या कारवाईमुळे अमळनेर पोलिसांच्या तत्परता, चिकाटी आणि तांत्रिक तपास कौशल्याचे कौतुक होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *