झाडांचा वाढदिवस साजरा करत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अमळनेर ( प्रतिनिधी)झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श तालुक्यातील शिरूड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घालून दिला. शाळेच्या परिसरात लावण्यात आलेल्या झाडांचा दुसरा वाढदिवस विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला.

वृक्षारोपण केल्यानंतर झाडांकडे दुर्लक्ष न करता त्यांची नियमित निगा, पाणी देणे व संगोपन करणे आवश्यक आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी झाडांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचा संकल्प केला.

‘झाडेही आपल्यासारखीच वाढतात, त्यांनाही काळजी आणि प्रेमाची गरज असते’, हा भाव विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. केवळ एक दिवस वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी संपत नाही, तर लावलेल्या प्रत्येक रोपाला जगवणे आणि मोठे करणे हीच खरी पर्यावरणसेवा असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होण्यास मदत झाली. झाडांकडे केवळ वनस्पती म्हणून न पाहता, त्यांचे संगोपन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे विद्यार्थ्यांनी कृतीतून दाखवून दिले.

व्ही. झेड. पाटील हायस्कूलचा हा अभिनव उपक्रम ‘वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन महत्त्वाचे’ हा संदेश देणारा असून, इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *