
शासनाच्या प्रतीक्षेपेक्षा ग्रामस्थांनीच उचलला पुढाकार; लोकवर्गणीतून सात्रीच्या नदीपात्रात रस्ता केला तयार
अमळनेर (प्रतिनिधी) स्वातंत्र्यपूर्व काळापासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सात्री गावातील ग्रामस्थांनी अखेर लोकवर्गणी आणि लोकसहभागातून नदीपात्रात रस्ता तयार केला आहे. शासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून हालअपेष्टा सहन करणाऱ्या ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत ट्रॅक्टरद्वारे माती आणून रस्ता तयार केला. त्यामुळे गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विकसित भारत आणि प्रगतिशील महाराष्ट्राच्या संकल्पनेत आजही एखाद्या गावात जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून मार्ग काढावा लागणे ही दुर्दैवी बाब आहे. सात्री गावाच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केली. काहींचे मृत्यू झाल्यानंतर शासनाला जाग आली आणि गिरणा पाटचारीच्या जागेतून रस्ता तयार करण्याचे आदेश देण्यात आले. पाच किलोमीटरच्या रस्त्यापैकी साडेतीन किलोमीटरचे कामही पूर्ण झाले. मात्र, निंभोरा शिवारातील जागेची मोजणी आणि सीमांकन करून न दिल्याने ठेकेदाराचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. निंभोरा शिवारातील मोजमाप भूमिअभिलेख विभागाकडे उपलब्ध नसल्याने आणखी एक तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.
पावसाळा संपल्यानंतर अमळनेर-सात्री बससेवा पुन्हा सुरू होते. मात्र, बससह ट्रॅक्टर, मोटारसायकली आणि इतर वाहनांना नदीपात्रातूनच मार्ग काढावा लागतो. पावसामुळे नदीपात्रात वाळू साचणे आणि खड्डे पडल्याने वाहतुकीच्या अडचणी निर्माण होतात. दूध व्यवसाय, शाळेत जाणारी मुले, शेतीमालाची ने-आण तसेच रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी नदीपात्रातूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे ग्रामस्थांना दरवर्षी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अखेर शासनाच्या कामाची प्रतीक्षा न करता सुधाकर बोरसे, शालीग्राम बोरसे, भिला बोरसे, महेंद्र पाटील, श्रीराम सोनवणे, सरपंच महेंद्र बोरसे, पोलीस पाटील विनोद पाटील, प्रभाकर बोरसे, भाऊसाहेब बोरसे, गणेश बोरसे, सुनील बोरसे, सचिन बोरसे, रामलाल मोरे, श्रीराम बागुल, राजेंद्र मोरे, हिरालाल सोनवणे, करण सोनवणे, अनिल ठाकरे, बाबूलाल बाविस्कर, ज्ञानेश्वर सोनवणे, दीपक मोरे, ताथु भिल, प्रीतम अहिरे आणि सदा मोरे यांच्यासह ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणी व लोकसहभागातून नदीपात्रात रस्ता तयार केला. ट्रॅक्टरद्वारे माती आणून रस्ता तयार केल्याने ग्रामस्थांची तात्पुरती वाहतुकीची सोय झाली आहे. शासनाच्या रखडलेल्या कामामुळे निर्माण झालेली अडचण ग्रामस्थांनी एकजुटीने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply