
मंगरूळच्या विकासकामांची राज्यस्तरीय दखल; सरपंच समाधान आधार पारधी यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, लोकनियुक्त सरपंच समाधान आधार पारधी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार – २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव २०२६ निमित्त हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. गावाच्या विकासासाठी सातत्याने राबविलेल्या विविध उपक्रमांसह लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक कारभार आणि समाजहिताला प्राधान्य देत केलेल्या प्रयत्नांची राज्यस्तरीय पातळीवर गौरवशाली दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दाखविलेली कार्यतत्परता यामुळे सरपंच समाधान आधार पारधी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
मंगरूळच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय सन्मान
मंगरूळ गावाच्या इतिहासात प्रथमच लोकनियुक्त सरपंचाला राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या सन्मानाबद्दल सरपंच समाधान आधार पारधी यांचे ग्रामस्थांसह तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
गावाच्या विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार असून, ग्रामस्थांच्या सहकार्याने भविष्यातही विकासकामे आणि समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply